Sunday 26 April 2015

तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा

अहमदनगरच्या आजच्या कार्यशाळेचा वृत्तांत
00:05
आज दि.२५.०४.२०१५ रोजी शिर्डी या ठिकाणी जिल्हा परिषद अहमदनगर च्या वतीने मा.शैलेश नवाल साहेब- मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. परिषदेसाठी प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब, शिक्षण आयुक्त मा. भापकर साहेब, शिक्षण संचालक मा. महावीर माने साहेब, विभागीय संचालक मा. रामचंद्र जाधव, उपसंचालक मा. दिनकर टेमकर साहेब, डाएटच्या प्राचार्या मा. ठोके मॅडम, मा. वैशालीताई गेडाम, मा. नामदेव माळी साहेब हे मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ५ शिक्षक, २ केंद्रप्रमुख, सर्व विस्तार अधिकारी व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
     परिषदेचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मा. कडूस साहेब यांनी केले. त्यांनी अहमदनगर जील्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. तसेच तंत्रस्नेही शिक्षक चळवळीबाबत जिल्ह्याचे नियोजन सांगितले. जिल्हा १०० % संगणकीकृत असून सर्व शाळांमध्ये ई लर्निंग सुरु करण्यासाठी राज्य तंत्रास्नेही शिक्षकांच्या सहभागातून कृती कार्यक्रम तयार करण्याबाबत माहिती दिली. यावेळी शाळा-केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी-जि.प यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी व पेपरलेस प्रशासनाच्या दृष्टीने पाऊल टाकताना anroid aap चे लाँचिंग मा. सचिव साहेब व आयुक्त साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
     परिषदेला संबोधित करताना मा. महावीर माने साहेबांनी सांगितले कि, अधिकाऱ्यांनी शाळा तपासणी करताना शिक्षकांना वेठीस धरून काय नाही हे पाहण्यापेक्षा जे आहे ते पाहावे. तसेच तंत्र शिक्षणाची कास धरून शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करावे. 
     यावेळी प्रयोगशील शिक्षिका मा. वैशालीताई गेडाम यांनी “मुलांच्या भावविश्वात डोकावताना ” या विषयावर संवाद साधला. मुलांना औपचारिक शिक्षण देण्याऐवजी त्यांना त्यांच्या मनाने व त्यांच्या गतीने शिकू द्यावे, शिक्षकांनी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधावा असे मत त्यांनी मांडले.
     मिरजचे गटशिक्षणाधिकारी मा. नामदेव माळी साहेब यांनी “ हसत खेळत शिकू या “ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, शिक्षकांना अधिकाऱ्यांची भीती वाटण्याऐवजी आपुलकी वाटावी. अधिकाऱ्यांनी शाळा भेट देताना विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, मुलांमध्ये जाऊन मिसळावे. कारवाईचा बडगा न दाखवता जे चांगले आहे त्याचे कौतुक करावे. शिक्षकांशी प्रेमाने संवाद साधला, त्यांना सपोर्ट केला तर गुणवत्ता विकास साधता येईल.
     राज्य तंत्रस्नेही शिक्षक समन्वय समितीचे व ATF चे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी ATF ची वाटचाल व तंत्रस्नेही शिक्षक गटाची निर्मिती यावर प्रेझेन्टेशन सादर केले. गुणवत्ता विकास साधण्यासाठी ATF च्या माध्यमातून राज्याला दिशादर्शक कार्यक्रम दिला जातो याबाबत त्यांनी माहिती दिली.
     यावेळी मा. नवाल साहेब व मा. कडूस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर टेक्नो टीचर्स च्या वतीने तंत्रस्नेही शिक्षक श्री. गणपत दसपुते, एल.पी. नरसाळे, गोरख पावडे, रमजान शेख, मिलिंद जामदार, अशोक पंडित, संतोष दहिवळ,  रविंद्र राऊत, संजय तेलोरे यांनी जिल्ह्यासाठी तयार केलेले  नियोजन श्री.सुरेश भारती यांनी सादर केले. दि.१८ च्या राज्यस्तरीय बैठकीनंतर जिल्ह्यात दि.२१ रोजी मा.शैलेश नवाल आणि मा.कडूस साहेब यांच्यासमवेत झालेल्या चारची माहिती मा.सचिव नंदकुमार साहेब यांना दिली. त्यानंतर अहमदनगर टेक्नो टीचर्सने जिल्ह्यातील सर्व तंत्रस्नेही लोकांना एका छत्राखाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या http://technoteachers.in/ या वेबसाईट विषयी माहिती दिली. यावर सर्व तंत्रस्नेही लोकांना नाव नोंदणी करण्याची सुविधा ठेवण्यात आलेली असून त्यात सुमारे २८ प्रश्न असल्याची माहिती भारती यांनी दिली. त्यातून तालुकास्तरावर ५ तज्ञ निवडले जाणार असुन ते प्रात्यक्षिक पद्धतीने निवडले जातील असे त्यांनी सांगितले. राज्याच्या धरतीवर प्रत्येक तालुक्यातून २ तंत्रस्नेही लोक जिल्ह्यासाठी घेऊन जिल्हा तंत्र स्नेही गट स्थापन केलेला असून त्यांच्या मदतीने तालुक्यातील तंत्र स्नेही लोक शोधले जातील असे ते म्हणाले. त्यासाठी तालुकास्तरावर तंत्र मेळावे घेतले जाणार आहेत, तसेच श्री.मिलिंद जामदार यांनी टेक्नो साठी तयार केलेल्या https://www.facebook.com/technoteachernagar?fref=ts या फेसबुक पेजची माहिती सांगितली. तीन दिवसात १००+ शिक्षकांनी टेक्नो वर नाव नोंदणी केल्याचे सांगितले. लवकरच जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या पाच तंत्र स्नेही शिक्षकांना दोन दिवसाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती भारती यांनी दिली.
      पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मा. दिनकर टेमकर साहेबांनी माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर या विषयी प्रेझेन्टेशन सादर केले. यावेळी त्यांनी गुगल ड्राईव्ह ची उपयोगिता सांगितली.
      शिक्षण आयुक्त मा. भापकर साहेब म्हणाले कि  शिक्षणात तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराणे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ होते. तंत्र स्नेही शिक्षक चांगले काम करत असून सर्वांच्या प्रयत्नातून गुणवत्ता विकास नक्कीच चांगला होईल.
     राज्याचे प्रधान शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेब यांनी आगामी शैक्षणिक वर्षातील गुणवत्ता विकासाबाबत प्रेझेन्टेशन सादर केले. यावेळी त्यांनी वाचन लेखन व इ. ४ थी पर्यंत सर्व प्राथ. गणिती क्रिया सर्व विद्यार्थ्यांना याव्यात हि अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठीचा पूर्ण कार्यक्रम शिक्षकांनी तयार करावा, शिक्षकांना पुरेसा वेळ शिकवण्यासाठी मिळावा म्हणून कोणतेही प्रशिक्षण लादले जाणार नाही, शाळेत येणारे प्रत्येक मुल हे शिकलेच पाहिजे यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांनी इतर शिक्षकांना मदत करावी, वर्गातील हुशार विद्यार्थ्यांनी मागे पडलेल्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत करावी अशा उपाययोजना मांडल्या. अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात विनोदी शैलीने त्यांनी गुणवत्ता विकास कार्यक्रमाची मांडणी केली. यावेळी त्यांनी राज्याला दिशा दर्शक कार्यक्रम सुचविल्या बद्दल तंत्रस्नेही शिक्षक श्री. सुरेश भारती व श्री सचिन कडलग याचा विशाश उल्लेख केला.
     तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेच्या निमित्ताने काही तंत्रस्नेही शिक्षकांनी आपल्याकडील उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले. डाएटचे आदिव्याख्याते मा. करवंदे सर यांनी डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मिती मधील डाएटचे योगदान याबाबत सादरीकरण केले. शेवगावच्या विस्तार अधिकारी मा. राऊळ मॅडम यांनी उपक्रमशील शाळांचे सादरीकरण केले. यातून उपस्थित सर्व शिक्षकांना गुणवत्ता विकासात शैक्षणिक तंत्रज्ञानाचे महत्व समजले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निरंतर चे शिक्षणाधिकारी मा. काळे साहेब यांनी केले. यावेळी तंत्रस्नेही शिक्षक श्री. गणपत दसपुते, एल.पी. नरसाळे, गोरख पावडे, रमजान शेख, मिलिंद जामदार, अशोक पंडित, संतोष दहिवळ,  रविंद्र राऊत, संजय तेलोरे हे उपस्थित होते.

No comments: