Sunday 26 April 2015

नांदेड येथे जिल्हास्तरीय ई-लर्निंग कार्यशाळा

हदगाव तालुक्यातील शाळा तंत्रस्नेही होणार'
               
📝बाळासाहेब राजे
             आज दि.25 एप्रिल 2015 शनिवार रोजी जिल्हा परिषद हायस्कुल हदगाव, जि. नांदेड येथे जिल्हास्तरीय ई-लर्निंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पष्टेपाडा, ता. शहापूर, जि. ठाणे येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. संदिप गुंड सर प्रमुख मार्गदर्शक होते. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रतिनिधींना व हदगाव तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी गुंड सरांच्या सोबत मा.केंद्रप्रमुख महेंद्र धिमते सर उपस्थित होते.
             सकाळी ठीक अकरा वाजता हदगाव तालुक्याचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी मा. श्री. येरपुलवार साहेब,  श्री. संदिप गुंड सर व केंद्रप्रमुख श्री. महेंद्र धिमते सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्री. महेंद्र धिमते सर यांनी ई- लर्निंग शाळेचा परिचय करुन दिला. यानंतर मा.श्री. नंदकुमार साहेब, शिक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी भ्रमणध्वनीवरून हदगाव तालुक्याचे मा. गटशिक्षणाधिकारी श्री. येरपुलवार साहेब व कार्यशाळेस उपस्थित 230 शिक्षकांशी संवाद साधला. मा. नंदकुमार साहेबांनी श्री. संदिप गुंड सर यांचे मनःपूर्वक कौतुक केले व हदगाव तालुक्यातील शिक्षकांना डिजीटल शाळा उभारण्याच्या कामाकरिता  शुभेच्छा दिल्या.
            साधारण पावणे बारा वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत श्री.संदिप गुंड सरांनी उपस्थित शिक्षकांना अनमोल मार्गदर्शन केले. एका आदिवासी पाड्यावरील दूर्लक्षित शाळेपासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. या पावणेचार तासातील त्यांच्या सादरीकरणावरून लक्षात आले की, हा प्रवास सहजासहजी झालेला नाही, यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. गुंड सरांनी तंत्रस्नेही शाळा काळाची गरज, तंत्रस्नेही शाळेसाठी आवश्यक संसाधने, त्यांच्या किमती, उपलब्धता व वापर याविषयी सखोल माहिती दिली. शाळाबाह्य असणा-या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी टॅबलेटचा कल्पकतेने वापर केला. हातावर पोट असणा-या पाड्यावरील लोकांमध्ये मिसळून त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. जागरूक झालेल्या पालकांनी शाळेला यथाशक्ती मदत केली. शाळेत प्रोजेक्टर आला, शाळा तंत्रस्नेही झाली, विद्यार्थी आवडीने शाळेत यायला लागले, कृतीआधारित अध्ययन-अध्यापन होऊ लागले, मुलांची गुणवत्ता वाढली. सुरुवातीला अवघड वाटणारा ज्ञानरचनेचा प्रवास गुंड सरांच्या प्रयत्नामुळे, श्री.धिमते सर व श्री. डोंगरे सरांच्या प्रोत्साहनामुळे आणि लोकसहभागामुळे समृद्ध होत गेला आणि शाळेने चक्क राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली गाठले. शाळा आज सर्व आधुनिक माहिती व तंत्रज्ञान साधनांनी सुसज्ज असून गुंड सरांचे विद्यार्थी पुस्तकाशिवाय टॅब, लॅपटॉप, डिजीटल बोर्डचा वापर करून स्वतःच कृतीआधारित शिक्षण घेतात. पष्टेपाडा शाळा आज अख्ख्या महाराष्ट्रातील  शिक्षकांची प्रेरणा बनली आहे. या प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहेत श्री. गुंड सर!
              श्री. गुंड सरांनी power point presentation द्वारे तंत्रस्नेही शाळेविषयी उत्तम मार्गदर्शन केले. सर म्हणाले की," आपण गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले की, लोकसहभाग आपोआप वाढतो." श्री.गुंड सरांच्या कार्याचे कौतुक करावे; तेवढे कमीचं आहे. ते स्वतःच्या शाळेचा विकास करून थांबले नाहीत; तर महाराष्ट्रभर डिजीटल शाळांची उभारणी व्हावी म्हणून ठिकठिकाणी कार्यशाळा घेत आहेत. शिक्षक बंधूभगिनींना प्रेरणा देत आहेत, त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत. 'कोणतेही काम मनापासून  केले की; ते उत्कृष्ट होते. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही; अन् वेडी माणसेच इतिहास घडवितात. असामान्य माणसे मळलेली वाट सोडून; स्वतःच स्वतःसाठी नवीन मार्ग शोधतात.' याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री. गुंड सर व त्यांची टीम!
                ई-लर्निंग कार्यशाळा शनिवारी म्हणजेच अर्ध्या सुट्टीच्या दिवशी आयोजित केलेली असूनही हदगाव तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व उपक्रमशील शिक्षक स्वतःहून उत्साहाने या कार्यशाळेस उपस्थित होते. श्री.संदिप गुंड व श्री. महेंद्र धिमते सरांच्या अतुलनीय कार्यामुळे हदगाव तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना निश्चितपणे प्रेरणा मिळाली असून येत्या काही दिवसांत आमच्याही शाळा डिजीटल होतील, यात शंका नाही.
         श्री. गुंड सरांच्या सादरीकरणानंतर नांदेड जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आम्ही लवकरच डिजीटल शाळा उभ्या करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही कार्यशाळा आयोजित व यशस्वी करण्यात पंचायत समिती हदगावचे मा.गटशिक्षणाधिकारी श्री.येरपुलवार साहेब व मा. शिक्षणविस्तार अधिकारी श्री. बाच्छे साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे.
📉तिरपी रेघ :- या जगातील काही माणसे मुळातचं वेडी असतात.📊सरळ रेघ :- वेडी माणसेच इतिहास घडवतात.
     तुम्हाला वेडं व्हायला आवडेल का?
🙏जाताजाता :- मी 8वीत असताना आमच्या पोतदार सरांनी आम्हाला समाजसुधारकांचे दोन प्रकार शिकविले होते. पहिला प्रकार- बोलते सुधारक, जे फक्त बडबड करतात. प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. दुसरा प्रकार- कर्ते सुधारक - जे आपल्या कामातूनच आदर्शांची उभारणी करतात.कार्यशाळेचे सन्माननीय आयोजक व मार्गदर्शक दुस-या प्रकारातील आहेत.

No comments: